Home क्रीडा भारतातील कसोटी प्रतिष्ठेला तडा ; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम

भारतातील कसोटी प्रतिष्ठेला तडा ; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम

0
105

गुवाहाटी- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय कसोटी क्रिकेटला गुवाहाटीच्या मैदानावर इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ५४९ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त १४० धावांत गारद झाली आणि सामना तब्बल ४०८ धावांनी गमावला. या पराभवाने भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा धावांच्या फरकाने झालेला पराभव अशी लाजिरवाणी नोंद झाली. याआधी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून नागपूरमध्ये ३४२ धावांनी झालेला पराभव हा विक्रम होता.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४४९ आणि दुसऱ्या डावात २६० धावा करून भारताला ५४९ धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले होते. चौथ्या दिवसाअखेर भारताने दोन विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या दिवशी सामना किमान अनिर्णित राखण्याचा प्रयत्न अपेक्षित होता; मात्र भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक खेळ करत केवळ १४० धावांवर समाधान मानले. सायमन हार्मर याने ६ विकेट्स घेत भारतीय डावाची वाट लावली तर केशव महाराज, मुथुसामी आणि यान्सेन यांनीही अचूक मारा करत भारताला दडपणाखाली ठेवले.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २-० असा क्लीन स्वीप मिळवत २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम साधला आहे. याआधी २००० मध्ये हान्सी क्रोन्येच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने भारताला २-० ने हरवले होते. तब्बल दोन दशके भारतीय भूमीवर मालिका न जिंकण्याचा दुष्काळ टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली अखेर संपुष्टात आला.

भारतासाठी हा लाजिरवाणा पराभव अनेक प्रश्न सोडून गेला आहे. घरच्या मैदानावर गेल्या तीन मालिकांपैकी ही भारतीय संघाची दुसरी व्हाइटवॉश नामुष्की. अलीकडेच न्यूझीलंडने ३-० ने क्लीन स्वीप दिल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही २-० ने नामोहरम केले. फलंदाजीत सलग अपयश, गोलंदाजीत खोबण, संघरचनेतील कमकुवतपणा आणि दडपणाखाली लढण्याची क्षमता कमी होत असल्याचा चित्र दिसून आले.

द. आफ्रिकेच्या पराक्रमाने आणि भारताच्या पराभवाने कसोटी क्रिकेटमधील भारताच्या वर्चस्वाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित केला आहे. आणि आता पुढील मालिकांपूर्वी भारताला स्वतःची रणनीती, संयोजन आणि मानसिकता नव्याने उभारावी लागणार आहे.


Protected Content

Play sound