जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात बहुप्रतीक्षित ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा अत्यंत भव्य आणि पारंपरिक पद्धतीने सुरू झाली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नटराजपूजन, श्रीफळ वाढवून आणि पारंपरिक घंटानाद करून या स्पर्धेला औपचारिक सुरुवात करण्यात आली. राज्यातील हौशी कलावंतांना आपली नाट्यकला सादर करण्याची संधी देणारी ही स्पर्धा जळगावमध्ये रंगत असल्याने स्थानिक कलाविश्वात उत्साहाचे वातावरण आहे.

उद्घाटन सोहळ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासोबत चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्षा डॉ. शमा सराफ, हास्यजत्रा फेम कलाकार हेमंत पाटील तसेच “बाई तुझ्या पायी” वेबसीरिजमधील जळगावचे कलाकार अनिल मोरे आणि चेतन कुमावत यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष दर्जा प्राप्त करून देणारी ठरली. स्पर्धेचे परीक्षक आणि समन्वयक प्रा. संदीप तायडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

नटराजपूजनानंतर केलेल्या घंटानादाने स्पर्धेला शुभारंभ झाल्याचे जाहीर करत जिल्हाधिकारी घुगे यांनी जळगावातील रंगकर्मींच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन उद्योग समूहासह सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख तर आभार नितीन तायडे यांनी मानले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर यांनी सादर केलेले “दानव” हे गूढ नाटक रंगभूमीवर अवतरले. अतुल साळवे लिखित आणि प्रवीण मोरे दिग्दर्शित या नाटकात मानवी स्वभावातील दुष्ट प्रवृत्ती, संघर्ष आणि गूढतेचा वेध घेण्यात आला. भयप्रद जंगलातील मोडकळी आलेल्या घरावर आधारित कथा दोन प्रवाशांभोवती फिरत रहस्यमय घटनांची मालिका रेखाटते. मुख्य पात्र चांडाली आणि भैरव यांच्यातील संवाद, संघर्ष आणि गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवत राहिली. कथानकाच्या उत्कर्षबिंदूवर चांडाली ही पोलीस अधिकारी असल्याचा उलगडा प्रेक्षकांसाठी मोठा धक्का ठरला.
प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य आणि वेशभूषेमुळे नाटकाची परिणामकारकता अधिक उठून दिसली. तांत्रिक बाजू घट्ट ठेवत प्रकाशयोजनाकार अतुल ब-हाटे यांनी भयावह वातावरण निर्माण केले, तर मोहित कांबळे यांच्या पार्श्वसंगीताने गूढता अधिक अनुभवता आली. नेपथ्यकार रोशन वाघ यांनी उभे केलेले नेपथ्य नाटकाचा आत्मा ठरले. कलाकार प्रवीण मोरे, शनाया खोसे, शुभम गुडा, सपना तिवारी, रोशन वाघ आणि महेश होनमाने यांच्या प्रभावी अभिनयाने नाटकाला वजनदार ठेवले.



