मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीचा वापर करून इंदोर येथील दोन सराईत चोरांना अटक करत पाच मोटारसायकली जप्त केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एफआयआर क्रमांक 345/2025, बीएनएस 303(2) नुसार दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अन्वर अफजल हुसैन (21) व शोएबअली करामतअली (22) ( दोघेही रा. इंदोर (म.प्र.)) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बजाज प्लॅटिना (MH 19 DM 4010) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली. प्रथमदर्शनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कस्टडी रिमांड मिळाला.

पोलिस कस्टडीदरम्यान आरोपींनी मुक्ताईनगरसह इतर ठिकाणी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोधमोहीम राबवून सनावद (जिल्हा खरगोन, म.प्र.) येथून एक मोटारसायकल, हिरो Passion Pro (किंमत अंदाजे 35,000 रुपये), हिरो Splendor बिननंबरची (किंमत अंदाजे 30,000 रुपये) तसेच मुक्ताईनगरातून दोन मोटारसायकली असा एकूण पाच मोटारसायकलींसह अंदाजे 1.50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे आरोपींचे गुन्हेगारी जाळे उघड झाले असून त्यांच्याकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असल्याने तपास अधिक वेगात सुरू आहे. शहरात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांनंतर झालेली ही कारवाई महत्त्वाची ठरली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
ही संपूर्ण कारवाई *पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे व पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण व हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.



