Home Cities जळगाव जळगाव महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये त्रुट्या : केवळ दोन दिवसात ४३ तक्रारी प्राप्त

जळगाव महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये त्रुट्या : केवळ दोन दिवसात ४३ तक्रारी प्राप्त

0
111

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेने (JMC) आगामी निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सुधारित यादीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असून, केवळ दोन दिवसांत तब्बल ४३ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते अशोक लाडवंजारी आणि छावा संघटनेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीतील त्रुटींमध्ये मयत मतदारांची नावे कायम असणे, अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे आणि मतदारांचे प्रभाग बदलण्यात झालेल्या चुका मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या त्रुटींमुळे यादीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मयत व्यक्तींची नावे अद्याप यादीत दिसत असल्याच्या तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. यादीतील सर्व चुका वैयक्तिक स्वरूपाच्या असल्याचा आरोपही या नेत्यांनी केला आहे. मनपाने यादीची व्यवस्थित तपासणी न करताच ती जाहीर केल्याचे दिसून येते.

या त्रुटींवर नागरिकांना २७ नोव्हेंबरपर्यंत आपले आक्षेप व तक्रारी दाखल करण्याची मुदत आहे. प्राप्त झालेल्या ४३ तक्रारी मनपा प्रशासनासाठी एक आव्हान असून, या त्रुटी त्वरित दूर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या गंभीर चुकांमुळे अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. मनपा या तक्रारींची दखल घेऊन याद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound