दोहा –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। रायझिंग स्टार टी-२० आशिया कप 2025 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत अ विरुद्ध बांगलादेश अ यांच्यात अभूतपूर्व थरार पाहायला मिळाला. इतिहासात पहिल्यांदाच हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला आणि त्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा अनपेक्षित फ्लॉप शो पाहायला मिळत बांगलादेशने एकाही चेंडूचा सामना न करता फायनलमध्ये धडक मारली. निर्णायक क्षणी भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघेही दडपणाखाली ढासळल्याचे चित्र दिसले.

सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर नियमाप्रमाणे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार जितेश शर्मा स्वतः फलंदाजीसाठी उतरले, परंतु हा निर्णय उलट ठरला. बांगलादेशच्या रिपन मंडोलने टाकलेल्या पहिल्याच अप्रतिम यॉर्करवर जितेश क्लीन बोल्ड झाले आणि भारतावर दडपण वाढले. नंतर आलेल्या आशुतोष शर्मालादेखील रिपनने झेलबाद करत भारताला दोन चेंडूंमध्ये दोन धक्के दिले. परिणामी, भारत सुपर ओव्हरमध्ये एकही धाव करू शकला नाही आणि बांगलादेशला केवळ एका धावेचे लक्ष्य मिळाले.

जरी एक धाव काही मोठे आव्हान नव्हते, तरी भारताच्या सूयश शर्माने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत सामना पुन्हा थरारक केला. भारताला फायनलची आशा जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटची गरज होती. पण सूयशचा दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेल्याने पंचांनी तो वाइड घोषित केला. नियमाप्रमाणे मिळालेल्या या एका अवांतर धावेमुळे बांगलादेशने एकही वैध चेंडू न खेळता सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
याआधीच्या मुख्य डावात बांगलादेशच्या संघाने दमदार कामगिरी करत २० षटकांत ६ बाद १९४ धावा उभारल्या होत्या. सलामीवीर हबीबुर रहमान सोहानच्या अर्धशतकासह एसएम मेहरोब हसनच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारतासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. भारताच्या वैभव सूर्यवंशीने १५ चेंडूत ३८ धावा करत स्फोटक सुरुवात दिली. त्याला प्रियांश आर्यचा ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावांचा दमदार प्रतिसाद मिळाला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्मा आणि नेहल वढेरा यांनी ३३ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
तथापि, निर्णायक क्षणी जितेशने आपली विकेट गमावली आणि सामना हातच्या अंतरावरून घसरला. रमनदीप सिंगने २६ धावा केल्या, तर आशुतोष शर्माने ८ चेंडूत १५ धावा करून सामना पुन्हा भारताकडे वळवला. परंतु शेवटच्या क्षणी तो बोल्ड झाल्याने भारताला सुपर ओव्हरवर समाधान मानावे लागले. हर्ष दुबेनं अखेरच्या चेंडूवर ३ धावा घेत सामना बरोबरीत नेला, परंतु सुपर ओव्हरमध्ये भारताच्या सिद्धीचा पाया खचला.
सुपर ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीला पाठविण्याऐवजी स्वतः फलंदाजी करणे हा कर्णधाराचा निर्णय फसल्याचे स्पष्ट झाले. दोन चेंडूत दोन विकेट्स गमावून भारताने फायनलमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी वाया घालवली.



