Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये पहाटे कोबिंग ऑपरेशन; नगर पालिका निवडणुकीत शांतता राखण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई

अमळनेरमध्ये पहाटे कोबिंग ऑपरेशन; नगर पालिका निवडणुकीत शांतता राखण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई

0
184

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर, पारोळा आणि एरंडोल नगर पालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उपविभागात सुरक्षा कडक करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडावी यासाठी अमळनेर शहरात पहाटे मोठ्या प्रमाणात ऑल आऊट / कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवणे आणि निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने ही मोहीम सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत युद्धपातळीवर पार पडली.

ही कारवाई मा. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी (IPS) यांच्या आदेशान्वये आणि मा. अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रये निकम यांच्यासह 5 पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले. पथकांची पाच स्वतंत्र टीम तयार करण्यात येऊन शहरातील विविध भागात सखोल तपासणी करण्यात आली.

कोबिंग ऑपरेशनदरम्यान NBW/BW वॉरंटधारक आरोपी, हदपार इसम, दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार तसेच अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर अशा सर्व श्रेणीतील संशयित गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. निवडणुकीदरम्यान संभाव्य उपद्रव निर्माण करू शकणाऱ्या एकूण 27 इसमांना पोलीस स्टेशनमध्ये आणून आदर्श आचारसंहितेबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

या कारवाईत 1 प्रोव्हिबिशन गुन्हा नोंदविण्यात आला, तर 4 आरोपींवर NBW वॉरंटची बजावणी करून अटक करण्यात आली. आगामी नगर पालिका निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडावी, शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कोते यांनी कडक सूचना दिल्या.


Protected Content

Play sound