Home Uncategorized मोठी बातमी : जामनेरातून साधनाताई महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

मोठी बातमी : जामनेरातून साधनाताई महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

0
234

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज अर्ज माघारी घेण्यासाठी एक दिवस बाकी असतांनाच जामनेरात मोठी घडामोड घडली असून नगराध्यक्षपदी साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जामनेर नगरपालिकेवर ना. गिरीश महाजन यांचे एकछत्री वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 25 जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीसाठी देखील भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. यातच अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस बाकी असतांना येथे मोठा इतिहास घडला आहे.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी अर्ज भरला होता, तर महाविकास आघाडीतर्फे रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी या तिन्ही प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

नगराध्यक्षपदासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सहा नगरसेवक उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये उज्वला दीपक तायडे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, महेंद्र कृपराम बाविस्कर, श्रीराम महाजन आणि किलुबाई जीमल्या शेवाळे यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष आणि सहा नगरसेवक मिळून भाजपने एकूण सात जागांवर बिनविरोध विजय मिळवला असून, जामनेर नगरपालिकेवर भाजपने आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, साधनाताई महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर होताच जामनेर येथे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला. तर जळगाव येथे देखील जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound