
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कामाच्या ठिकाणी होणारा सततचा त्रास आणि ‘नोकरी कायम’ करण्यासाठी लाखो रुपये घेऊनही कामावरून काढून टाकल्याच्या तीव्र नैराश्यातून जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.

या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी थेट महाविद्यालयाच्या प्रांगणात मृतदेह आणून दोषी संस्थाचालक आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
देविदास कॉलनीतील रहिवासी महेश भास्करराव सावदेकर (वय ५२) हे मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. कामावरून काढून टाकल्याच्या तणावातून त्यांनी सोमवारी दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
मृतक महेश सावदेकर यांच्या पत्नी यशोदा सावदेकर आणि भाची प्रियंका भालेराव यांच्यासह कुटुंबीयांनी महाविद्यालयातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, महेश यांना कामावर कायम करण्यासाठी संस्थेला तब्बल १५ लाख रुपये देण्यात आले होते. तसेच, जास्त पगार दाखवून त्यांच्याकडून सही घेतली जायची आणि प्रत्यक्षात कमी पगार दिला जात होता. दीड महिन्यांपूर्वी कोणतेही कारण न देता महेश यांना कामावरून काढून टाकण्यात आले. नोकरी परत मिळवण्यासाठी वारंवार विनंती करूनही उडवाउडावीची उत्तरे मिळाल्याने ते नैराश्यात गेले. यापूर्वी २१ जून रोजीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन
महेश सावदेकर यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांचा मृतदेह थेट मू.जे. महाविद्यालयाच्या आवारात आणला. या वेळी संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत संस्थाचालकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह तेथून न हलवण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने महाविद्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



