चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः अर्जांचा महापूरच ओसंडून वाहिला. शहरातील राजकीय वातावरण दिवसभर तापलेले असताना उमेदवार आणि समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अंतिम क्षणापर्यंत झालेल्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे चोपड्यात निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगू लागली आहे.
नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस अत्यंत गजबजलेला राहिला. सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवार व समर्थक नगरपालिका कार्यालयात मोठ्या संख्येने दाखल होत होते. दिवसअखेर नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवारांनी एकूण १३ अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी तब्बल २६२ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी कविता रवींद्र पाटील यांनी दोन, दिपाली विनोद चव्हाण यांनी एक, राजनंदिनी राजेंद्र पाटील यांनी एक, रोहिणी प्रकाश पाटील यांनी एक, मनीषा जीवन चौधरी यांनी एक, साधना नितीन चौधरी यांनी दोन, नम्रता सचिन पाटील यांनी चार तर तबस्सुम आबीद खाटीक यांनी एक अर्ज दाखल केला.

नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय अर्ज दाखल करण्याची संख्या देखील लक्षणीय होती. प्रभाग क्रमांक १ मध्ये १९, प्रभाग २ मध्ये १७, प्रभाग ३ मध्ये २६, प्रभाग ४ मध्ये २४, प्रभाग ५ मध्ये १५, प्रभाग ६ मध्ये १९, प्रभाग ७ मध्ये २०, प्रभाग ८ मध्ये १६, प्रभाग ९ मध्ये १३, प्रभाग १० मध्ये १५, प्रभाग ११ मध्ये १३, प्रभाग १२ मध्ये १३, प्रभाग १३ मध्ये १२, प्रभाग १४ मध्ये २४ तर प्रभाग १५ मध्ये १६ अर्ज दाखल झाले. सर्व प्रभागांमध्ये नागरिकांची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.
या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीकडून भाजपच्या साधना नितीन चौधरी यांनी नामनिर्देशन दाखल केले. शिवसेना शिंदे गटाकडून नम्रता सचिन पाटील तर शिवसेना उभाठा गटाकडून रोहिणी प्रकाश पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. डॉ. कविता रवींद्र पाटील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. माघारीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल आणि समोरासमोरची झुंज रंगणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नामनिर्देशनाच्या गदारोळात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्या अर्ज दाखलवेळी माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधले. तर भाजप, शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दिवसभर उत्साहात कार्यरत होते.
निवडणुकीच्या तयारीचा वेग वाढत असताना चोपडा शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे.



