भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या तीन दिवसांच्या अंतरात एकाच तलावात दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातील पहिली घटना १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा वाल्मीक संजय हयाळींगे (वय २७) यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यासमोरील तलावात सापडला. वाल्मीक हा ११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. वाल्मीक बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात असतानाच, १३ नोव्हेंबर रोजी तलावाशेजारील हॉटेलमध्ये काम करणारे नारायण रामदास हयाळींगे (वय ५२) हेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले. अखेर, १६ नोव्हेंबर रोजी त्यांचाही मृतदेह त्याच तलावात त्याच ठिकाणी आढळून आला.

एकाच ठिकाणी, एकाच तलावात तीन दिवसांच्या अंतराने दोघांचे मृतदेह सापडल्यामुळे गावात घातपात आणि खुनाच्या चर्चांना उधाण आले आहे. वाल्मीकच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे की, वाल्मीकला शेवटचे त्याच्या मित्रासोबत नारायण हयाळींगे यांनीच पाहिले होते. त्यामुळे नारायण यांचाही घातपात झाला असावा किंवा ते या घटनेचे साक्षीदार असल्याने त्यांना संपवण्यात आले असावे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या दुहेरी मृत्यूच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि मारेकऱ्यांना तत्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी एरंडोल–भडगाव महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांनी तपासाची हमी दिल्यानंतर आणि काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पिंपरखेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



