जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरामध्ये शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास विलास मधूकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी) या वृद्ध व्यक्तीला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी विलास जाधव यांच्या दुचाकीवर ठेवलेली ८ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी आणि त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेला.
याबाबत शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास जाधव हे शुक्रवारी सायंकाळी त्यांची दुचाकी (एमएच १९ एए ७७२६) घेऊन शहराकडे जात होते. त्यांनी ८ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीच्या पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवली होती. एमआयडीसीतील बीएचआर पतपेढीजवळ असताना त्यांना मोबाईलवर कॉल आल्याने ते रस्त्यावर थांबले.

ते मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असतानाच, मागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली. त्यांनी विलास जाधव यांच्या दुचाकीवर ठेवलेली पैशांची पिशवी आणि त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि वेगाने पसार झाले. विलास जाधव यांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत चोरटे दृष्टीआड झाले होते.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुसऱ्या दिवशी विलास जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत. परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.



