पटना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुलगी रोहिणी आचार्य यांनी रविवारी सोशल मीडियावर एक भावनिक आणि वेदनादायी पोस्ट करत कुटुंबातील व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या पोस्टने संपूर्ण बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
रोहिणी आचार्य यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही व्यक्तींनी स्वतःचा मानसिक छळ केल्याचे, तसेच अपमानास्पद वर्तन केल्याचे म्हटले आहे. “मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलली. मी ढसाढसा रडत आई-वडिलांचं घर सोडलं,” असे रोहिणींनी लिहिले. त्यांनी संजय यादव आणि रमीज यांच्यावर थेट आरोप करत, त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना माहेर सोडावे लागल्याचे नमूद केले.

आपल्या स्वाभिमानाचा उल्लेख करत रोहिणी म्हणतात, “मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. मी सत्याची साथ सोडली नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला.” पुढे लिहिताना त्या म्हणतात, “काल, एक मुलगी तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडून निघून गेली. मला माझं माहेर सोडण्यास भाग पाडलं… मला अनाथ करण्यात आलं.”
कालच रोहिणी आचार्य यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा, तसेच कुटुंबापासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. रोहिणींच्या वक्तव्यांनी कुटुंबीयांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर येत असून लोकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप लालू प्रसाद यादव किंवा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.



