Home मनोरंजन दुबईमध्ये उभा राहणार ‘शाहरुखज़ डेन्यूब’ टॉवर; ४ हजार कोटींचा प्रकल्प

दुबईमध्ये उभा राहणार ‘शाहरुखज़ डेन्यूब’ टॉवर; ४ हजार कोटींचा प्रकल्प

0
136

 मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची लोकप्रियता फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तर मध्यपूर्वेसह जगभरात त्यांचे प्रचंड चाहते आहेत. विशेषतः दुबईमध्ये शाहरुखच्या नावाचा जबरदस्त क्रेझ असून, याच प्रेमाची झलक आता एका भव्य प्रकल्पातून दिसणार आहे. दुबईमध्ये शाहरुख खान यांच्या नावावर ४ हजार कोटी रुपयांची भव्य कमर्शियल इमारत उभारली जात असून, शुक्रवारच्या एका कार्यक्रमात खान यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाहरुख खान यांनी ‘शाहरुखज़ डेन्यूब’ या भव्य टॉवरचे अनावरण केले. या प्रकल्पामागील डेन्यूब प्रॉपर्टीजचे संस्थापक आणि चेअरमन रिजवान साजनही उपस्थित होते. साजन यांनी सुपरस्टार शाहरुखच्या नावावर आलिशान इमारत उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. या इमारतीमुळे शाहरुखच्या जागतिक लोकप्रियतेला आणखी अधोरेखित करणारा एक नवा आयाम जोडला जाणार आहे.

आपल्या नावावर दुबईमध्ये उभ्या राहणाऱ्या या इमारतीबद्दल शाहरुख भावुक झाले. “माझी आई जिवंत असती तर तिला खूप आनंद झाला असता. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. उद्या माझी मुलं या टॉवरकडे बघून म्हणतील – ‘हे बघा, ही आपल्या पप्पांची बिल्डिंग आहे’, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. चाहत्यांच्या मनातील प्रेमाची हीच दाद आहे, असेही ते म्हणाले.

या टॉवरच्या संकल्पनेमागील मानवीकडे पाहण्याचा दृष्टीकोन शाहरुख यांनीही मांडला. रिजवान साजन यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रकल्पाशी जोडले जावे, अशी इच्छा शाहरुखसमोर व्यक्त झाली. “रिजवान भाईंच्या साध्या आणि सकारात्मक कल्पनेने मला स्पर्श केला. अनेक लोकांचे स्वप्न असते की मोठ्या शहरात त्यांचे स्वतःचे घर असावे. जर मी या स्वप्नाचा एक भाग बनू शकलो, प्रेरणा देऊ शकलो, तर हे माझ्यासाठी मोठे गिफ्ट आहे,” असे त्यांनी नमूद केले.

‘शाहरुखज़ डेन्यूब’ हा एक ५६ मजली व्यावसायिक टॉवर असून २०२९ पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे ४ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. टॉवरमध्ये अत्याधुनिक सोयी, हेलीपॅड, स्विमिंग पूल आणि उच्च-स्तरीय व्यावसायिक सुविधा असतील. विशेष म्हणजे, एखाद्या मुस्लिम देशात प्रथमच एका मुस्लिम अभिनेत्याची मूर्ती लावली जाण्याची नोंद या प्रकल्पामुळे होणार आहे.

डेन्यूब प्रॉपर्टीज ही दुबईतील मोठी आणि प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी असून तिचे संस्थापक रिजवान साजन हे मूळचे भारतीय आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस १९’मध्येही डेन्यूब प्रॉपर्टीजचे प्रमोशन करण्यात आले होते. शाहरुख खानच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचे झाल्यास, ते लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत ‘किंग’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचा पहिला टीझर अभिनेता शाहरुखच्या वाढदिवशी खास रिलीज करण्यात आला होता.


Protected Content

Play sound