
पाचोरा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक, न्यायिक आणि प्रशासनाकडून रखडलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी समता सैनिक दलाने तहसील कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे. वारंवार निवेदने, निषेध मोर्चे आणि चर्चेनंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण पण ठाम लढा उभारला आहे.

समता सैनिक दलातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ६ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या या धरणे आंदोलनाला दररोज नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. १० नोव्हेंबर रोजी पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक मृतदेह, तिरडी आणि मडके ठेवून प्रशासनाचा निषेध नोंदवला. जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे, सहसचिव अभिमन बाविस्कर, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, भडगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी आहेत.
आंदोलनकर्त्यांनी तालुक्यातील विविध गावांमधील राखीव स्मशानभूमीच्या जागांवरील अतिक्रमण तत्काळ हटवून संबंधित समाज बांधवांच्या ताब्यात देण्याची मुख्य मागणी केली आहे. वाणेगाव, खेडगाव (नंदीचे), आसनखेडा खुर्द व बुद्रुक या गावांमधील बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीच्या जागांवर तार कंपाऊंड करून ताबा सोपवण्याची मागणी आंदोलक सातत्याने करीत आहेत.
भडगाव तालुक्यातील गिरड येथील समाज प्रबोधनासाठी ओट्याची जागा मंजूर करण्याची मागणी देखील प्रमुख मुद्दा आहे. तसेच रमाई घरकुल योजना, भिल्ल–नवबौद्ध घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. शासनाने मंजूर केलेल्या घरकुल योजनांचे त्वरित वाटप करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
अंजनविहिरे येथील मागासवर्गीय शेतकरी ईश्वर माणिक सोनवणे यांच्या नावे गिरड शिवारातील जमीन चुकीच्या पद्धतीने इतरांच्या नावावर चढवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या गट नं. २३२ मधील १ हेक्टर ४२ आर क्षेत्रफळाची जमीन त्वरित त्यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक संकटामुळे दलित, आदिवासी, भिल्ल आणि शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई, घरांचे पुनर्वसन आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी मागणी समता सैनिक दलाने केली आहे.
जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सीमधील अतिक्रमणाबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशांनंतरही ग्रामपंचायतीने कारवाई न केल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. गोराडखेडा खुर्द येथील ओपन प्लेसवरील बेकायदेशीर बांधकाम तातडीने हटवून परिसर सुशोभित करण्याची मागणी देखील सातत्याने मांडली जात आहे.
पाचोरा शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्या भव्य पुतळ्याचा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला. पुतळ्यासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने हे धरणे आंदोलन सुरू असून आज त्याचा नववा दिवस आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार समता सैनिक दलाने व्यक्त केला आहे.



