Home Uncategorized जळगाव पोलीसांनी राबविली महा कोम्बिंग ऑपरेशन; रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना अटक

जळगाव पोलीसांनी राबविली महा कोम्बिंग ऑपरेशन; रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना अटक

0
121

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी, जळगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 ते 7 वाजेच्या दरम्यान धडक ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या थेट नेतृत्वाखाली राबवलेल्या या अभूतपूर्व कारवाईत, जळगाव शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 104 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना एकाच ठिकाणी हजर करून, भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात आढळल्यास थेट ‘तडीपारी’ कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर ‘प्रिव्हेंटिव्ह’ (प्रतिबंधात्मक) कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, आज पहाटेच्या अंधारात या ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ची आखणी करण्यात आली.

या व्यापक मोहिमेत खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड, रामानंद नगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षक कावेरी कमलाकर आणि शहर पोलीस स्टेशनचे सुरेश आव्हाड हे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. LCB चे पीएसआय आणि मोठा पोलीस फौजफाटा याकामी तैनात करण्यात आला होता.


Protected Content

Play sound