Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक ; तब्बल २४ मोटारसायकली जप्त

अमळनेरमध्ये दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक ; तब्बल २४ मोटारसायकली जप्त

0
144


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या मालिकेचा शेवटी अमळनेर पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शोध पथकाने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम जंगल परिसरातून दोन संशयितांना पकडून तब्बल १५ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शदत्तात्रय निकम यांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.

या तपासात हिंमत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोघे रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) हे आरोपी दुचाकी चोरी प्रकरणात गुंतलेले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव परिसरातील डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलात मोठी शोधमोहीम राबवून दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अमळनेरसह विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

आरोपींनी चोरी केलेल्या मोटारसायकली नंदुरबार जिल्ह्यातील सातपिंप्री गावाजवळील जंगलात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने व पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार केलेल्या या कारवाईत २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या दुचाकींची एकूण किंमत १५ लाख ६३ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोउपनि शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांनी विशेष भूमिका बजावली. आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील व पोकॉ सागर साळुंखे करत आहेत.


Protected Content

Play sound