Home राजकीय लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! केवायसीतील अडचणीबाबत सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! केवायसीतील अडचणीबाबत सरकारचा मोठा निर्णय

0
209


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबनाचा आधार मिळत असताना केवायसी प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थिनी अडचणीत सापडल्या होत्या. मात्र, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी या समस्येबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

तटकरे यांनी सांगितले की, सध्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या वेबसाईटवर काही तांत्रिक सुधारणा सुरू आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबात पती किंवा वडील नाहीत, त्यांना केवायसी करता येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संकेतस्थळात आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे. हे बदल पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना सहजपणे केवायसी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभरातील महिलांकडून सध्या ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. कधी सर्व्हर डाऊन तर कधी आधार पडताळणीमध्ये त्रुटी दिसत असल्याने महिलांना त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना त्वरित सुधारणा करण्याचे आदेश दिले असून, वेबसाईट वापरण्यास सुलभ बनविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. त्यामुळे अनेक महिला केवायसीसाठी धडपड करत असताना संकेतस्थळावरील बदलांमुळे प्रक्रिया काही काळासाठी विलंबित झाली आहे. मात्र, सरकारकडून तांत्रिक सुधारणा पूर्ण होताच महिलांना कोणतीही अडचण न येता केवायसी करता येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, महिला संघटनांकडून केवायसीची मुदत वाढवून देण्याची मागणीही केली जात आहे. संकेतस्थळावरील बदल आणि वाढलेली गर्दी पाहता सरकार या मागणीवर विचार करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, आदिती तटकरे यांच्या घोषणेमुळे महिलांमध्ये मोठा दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound