Home प्रशासन नगरपालिका केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटिसा 

केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटिसा 

0
162


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील केळी बाजारात गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून मातीमोल दरात केळी खरेदी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी दप्तर तपासणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या निर्णयामुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी यावल येथे व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांची सामायिक बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांबाबत अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. व्यापारी मंडळी केळीच्या दरांमध्ये मनमानी करीत असून शेतकऱ्यांना योग्य भाव न देता तोटा पोहचवत असल्याचे आरोप या वेळी झाले. त्यावर उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्याचाच पुढचा टप्पा म्हणून यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांना आपले हिशोब पुस्तके, बँकेचे पासबुक किंवा अद्ययावत स्टेटमेंट बाजार समितीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीच्या दरम्यान अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विपणन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार ठोस कारवाई करण्यात येणार आहे.

सभापती राकेश फेगडे यांनी सांगितले की, “बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळावा आणि केळी बाजारात पारदर्शकता यावी, यासाठी ही कार्यवाही आवश्यक आहे.”

या कारवाईमुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून, पुढील काही दिवसांत बाजारातील व्यवहारांवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. शेतकरी मात्र या निर्णयाचे स्वागत करत आहेत आणि बाजार समितीने हे पाऊल योग्य वेळी उचलल्याचे मत व्यक्त करत आहेत.


Protected Content

Play sound