Home क्राईम मुंब्रा येथे उर्दू शिक्षक अटकेत; अल-कायदाशी संबंध उघड — एटीएसची मोठी कारवाई

मुंब्रा येथे उर्दू शिक्षक अटकेत; अल-कायदाशी संबंध उघड — एटीएसची मोठी कारवाई

0
124


मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईत एका उर्दू शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याचे अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे जाळे महाराष्ट्रातदेखील खोलवर पोहोचल्याचे गंभीर वास्तव उघड झाले आहे.

एटीएसने बुधवारी पहाटे मुंब्रा-कौसा परिसरातील एका घरावर छापा टाकला आणि इब्राहिम अबीदी नावाच्या उर्दू शिक्षकाला ताब्यात घेतले. अबीदी हा गेल्या काही वर्षांपासून मुंब्र्यात भाड्याच्या घरात राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकवत असे. वरकरणी तो एक सामान्य शिक्षक म्हणून ओळखला जात असला तरी एटीएसच्या तपासात त्याचे अल-कायदाशी दुवे असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबीदी हा केवळ भाषाशिक्षणात गुंतलेला नसून तो लहान मुले, तरुण आणि उच्चशिक्षित नागरिकांना कट्टर विचारधारेकडे वळवण्याचे काम करीत होता. समाजातील ‘व्हाईट-कॉलर’ वर्गाला ब्रेनवॉश करून स्लीपर सेल तयार करण्यामागे त्याची भूमिका असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या कारवाईचा संबंध पुणे एएक्यूआयएस प्रकरणाशी (AQIS Case) जोडला गेला आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर झुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.

एटीएसच्या चौकशीत उघड झाले की झुबेर हंगरगेकर हा मुंब्र्यातील याच उर्दू शिक्षकाच्या घरात झालेल्या एका गुप्त बैठकीत सहभागी झाला होता. या बैठकीत दहशतवादी विचारसरणी, नेटवर्किंग आणि बॉम्बनिर्मिती तंत्रज्ञानाबाबत चर्चा झाल्याचा संशय आहे. झुबेरच्या जुन्या मोबाईल फोनमधून ओसामा बिन लादेनच्या भाषणांचे उर्दू भाषांतर, अल-कायदाशी संबंधित गोपनीय दस्तऐवज तसेच ‘इंस्पायर’ नावाचे मासिक जप्त करण्यात आले आहे. या मासिकात बॉम्ब तयार करण्याच्या सविस्तर सूचना असल्याचेही एटीएसने सांगितले आहे.

या कारवाईनंतर एटीएसने इब्राहिम अबीदीच्या मुंब्रा आणि कुर्ल्यातील (दुसऱ्या पत्नीचे घर) दोन्ही ठिकाणांची झडती घेतली. तपासादरम्यान संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि डिजिटल फाइल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तांत्रिक तपासणीसाठी ही सर्व सामग्री फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. या तपासातून मुंबई आणि उपनगरात अल-कायदाचे नेटवर्क किती खोलवर पसरले आहे, याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

सध्या एटीएसकडून इब्राहिम अबीदीची कसून चौकशी सुरू असून त्याच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. राज्यातील विविध भागांत या कारवाईनंतर दहशतवादी नेटवर्क सक्रिय असल्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवसांत अजून काही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound