Home Cities जळगाव जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवर वादंग : राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा अधिकाऱ्यांवर...

जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवर वादंग : राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

0
199

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू असताना, या प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे. पक्षाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही मनपा अधिकारी आणि कर्मचारी राजकीय दबावाखाली तसेच आर्थिक आमिषाला बळी पडून एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी महानगरपालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मतदार यादी तयार करण्याचे काम पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी मनपा अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या फायद्यासाठी जाणूनबुजून मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट करत आहेत. हे कृत्य निवडणूक प्रक्रियेच्या मूलभूत तत्त्वांना विरोधी असून लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असल्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी वैयक्तिक तसेच पक्ष स्तरावर कायदेशीर हरकत घेण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात आवश्यक पुरावे गोळा करून न्यायालयात जाण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांनी वेळेत या बाबीकडे लक्ष दिल्यास आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना समज देऊन मतदार यादीचे पुनर्निरीक्षण केल्यास लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ राहील, असेही पक्षाने निवेदनात नमूद केले आहे.

पक्षाने निवेदनाद्वारे प्रशासनास विनंती केली आहे की, मतदार यादीतील गोंधळ, फेरबदल आणि राजकीय दबावाखाली झालेल्या नावांच्या समावेशनांची तपासणी करूनच अंतिम मतदार यादी प्रकाशित करावी. अन्यथा, प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घेऊन न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, सुहेम तडवी, डॉ. रिजवान खाटीक, किरण राजपूत आदींच्या स्वाक्षरी आहेत.


Protected Content

Play sound