Home क्राईम लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, दिल्ली हादरली!

लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, दिल्ली हादरली!

0
128

दिल्ली–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात आज सायंकाळी झालेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. मेट्रो गेट क्रमांक एकाजवळ उभी असलेली कार अचानक स्फोटाने उद्ध्वस्त झाली, या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखंमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, दिल्ली पोलिसांनी तत्काळ सुरक्षा वाढवून तपास सुरू केला आहे.

स्फोट इतका तीव्र होता की कार पूर्णतः जळून खाक झाली आणि जवळच्या दोन कारलाही आग लागली. स्फोटाचा आवाज परिसरातील अनेक भागात ऐकू गेला, तर लाल किल्ला परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्याचेही साक्षीदारांनी सांगितले. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, ज्यामुळे पोलिसांना परिसर रिकामा करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले, तरी या घटनेमागे घातपाताचा कोणता हेतू होता का, याची चौकशी सुरू आहे.

या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी परिसर सील केला असून, मेट्रो स्टेशनवरील हालचाली काही काळासाठी थांबवण्यात आल्या. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कारमध्ये असलेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असण्याची शक्यता नाकारली जात नाही.

दरम्यान, याच काळात हरियाणातील फरिदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणि दोन एके-४७ रायफल्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन घटनांमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दिल्लीतील स्फोट आणि फरिदाबाद येथील स्फोटक जप्ती यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

घटनेने राजधानीत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभाग या घटनेकडे अतिशय गांभीर्याने पाहत असून, स्फोटामागील सत्य लवकरच उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound