पाचोरा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थांचे कार्य आणि शासनयंत्रणेचे व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनमधील विविध विभागांचे कामकाज जाणून घेतले आणि पोलिसांच्या दैनंदिन कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
शनिवार, १० नोव्हेंबर रोजी इयत्ता पाचवीतील एकूण १६४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही भेट दिली. विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील विविध विभागांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण कक्ष, संगणक कक्ष, गार्ड रूम, बारनिशी विभाग, ठाणे अंमलदार कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, लॉकअप, गुन्हे शोध पथक, मुद्देमाल कक्ष, क्राईम रायटर आणि गोपनीय शाखा या सर्व विभागांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.

या शैक्षणिक दौर्यादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न विचारले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निराकरण केले. तसेच उपनिरीक्षक योगेश गणगे, हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी आणि कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलिस दलातील शिस्त, जबाबदारी आणि समाजातील त्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शाळेच्या शिक्षिका शितल पाटील, तिलोत्तमा सोळंके, मंजुश्री पाटील, जाई पाटील तसेच शिक्षक गणेश मोरे आणि सतीश पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक भाव निर्माण व्हावा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल आदरभाव आणि जागरूकतेची भावना निर्माण झाल्याचे शाळेच्या शिक्षकांनी नमूद केले.



