फरीदाबाद–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरात सुरक्षा यंत्रणांना हादरवणारी घटना हरियाणातील फरीदाबाद येथे उघडकीस आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी येथील एका डॉक्टरच्या खोलीवर छापा टाकत तब्बल 300 किलो RDX, AK-56 रायफल, 84 काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे. आरोपी डॉक्टरचे नाव आदिल अहमद असून, त्याला 7 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार फरीदाबादमधील ही कारवाई पार पडली.
डॉ. आदिल अहमद हा पूर्वी अनंतनाग येथील जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. मात्र 2024 मध्ये त्याने नोकरीचा राजीनामा देऊन सहारनपूरमध्ये स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने फरीदाबादमधील धौज गावात एक खोली भाड्याने घेतली होती. तो स्वतः त्या खोलीत राहत नव्हता, तर ती फक्त स्फोटक साहित्य साठवण्यासाठी वापरली जात होती.

छाप्यातून पोलिसांना 14 बॅगा, ज्यामध्ये 300 किलो RDX, 5 लिटर रसायने, AK-56 रायफल, 84 काडतुसे, दोन स्वयंचलित पिस्तुले आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे उपकरणांसह 48 वस्तू जप्त करण्यात आल्या. या कारवाईत जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात पोलिसांचा संयुक्त सहभाग होता. घटनास्थळी एकाच वेळी 10 ते 12 वाहने पोहोचली होती, आणि परिसरात मोठ्या सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आल्या.
या कारवाईनंतर आदिल अहमदवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत त्याच्या दहशतवादी संघटनांशी संभाव्य संबंधांचा शोध घेतला जात आहे. पोलिस सूत्रांनुसार, अशा प्रकारचे स्फोटक साठवण दहशतवादी कारवायांसाठीच केली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गुजरात एटीएसने 9 नोव्हेंबर रोजी अहमदाबादजवळील अदलाज येथे मोठी कारवाई करत आयसिसशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संशयितांकडून तीन पिस्तुले, 30 काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात रसायने जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हे तिघे उत्तर प्रदेश आणि हैदराबाद येथील असल्याचे समोर आले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या दोन्ही कारवाया एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दहशतवादी गटांनी देशभरातील अनेक ठिकाणी हल्ल्यांची योजना आखली होती, अशी माहिती तपासात पुढे येत आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, NIA आणि इतर राज्यांच्या एटीएस पथकांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.



