Home पर्यावरण पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘हाय अलर्ट’ जारी

पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘हाय अलर्ट’ जारी


मुंबई –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरात यावर्षी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक राज्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे शेती आणि ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले. काही दिवसांपासून हवामान स्थिर दिसत असतानाच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देत ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. हा इशारा ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान देशातील अनेक राज्यांसाठी देण्यात आला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, देशाच्या चार भागांमध्ये सध्या ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ सक्रिय झाले आहे. यामध्ये पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर, पश्चिम बंगाल परिसरात, उत्तर तामिळनाडूवर आणि हरियाणामध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये हवामानात मोठा बदल दिसून येत असून पुन्हा एकदा पावसाचे आगमन होणार आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे पुढील चार दिवस जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. केरळमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही भागांत वाऱ्याचा वेगही वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.

तर उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, दक्षिण हरियाणा आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सरासरी तापमान दोन ते चार अंश सेल्सिअसने घटू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. ग्रामीण भागात विशेषतः सकाळी आणि रात्री गारठा जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पूर्वोत्तर भारतात मात्र थंडी आणि पाऊस अशा मिश्र हवामानाची स्थिती दिसू शकते. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. हवामानातील या अचानक बदलाचा परिणाम शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर होऊ शकतो.

देशभरातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर होण्याची चिन्हे दिसत असून महाराष्ट्रातील नागरिकांनी पुढील काही दिवस पावसासाठी सज्ज राहावे, असा सल्ला आयएमडीने दिला आहे.


Protected Content

Play sound