Home राजकीय रावेर प्रभाग ३ मध्ये धार्मिक की जातीय ध्रुवीकरण? निर्णायक ठरणार बारी-तेली समीकरण!

रावेर प्रभाग ३ मध्ये धार्मिक की जातीय ध्रुवीकरण? निर्णायक ठरणार बारी-तेली समीकरण!


रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल तापू लागला असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये धार्मिक की जातीय ध्रुवीकरण होणार, याबाबत शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रभागात बारी समाज आणि तेली समाजाचे प्रभावी कॉम्बिनेशन असल्याने निवडणुकीचा कल ठरवण्यात हे दोन समाज निर्णायक ठरणार आहेत. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने या प्रभागात कोणाचे गणिते बसणार आणि कोणाचे बिघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेरच्या उत्तर भागातील हा प्रभाग नगरपरिषदेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आठ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत ॲड. सूरज चौधरी आणि संगीता भास्कर महाजन हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. यंदा पुरुष ओबीसी जागेसाठी भाजपकडून अरुण दत्तात्रेय आस्वार आणि भूषण रामदास चौधरी हे इच्छुक आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून गोपाळ सुधाकर सुतार हे सक्रिय मैदानात उतरले आहेत. महिला सर्वसाधारण जागेसाठी योगिता भूषण चौधरी (महाजन) यांनी इच्छुकता दाखवली आहे.

या प्रभागाची मतदारसंख्या ३,१०५ असून त्यापैकी मुस्लिम मतदार ९००, बारी समाज ४३०, तेली समाज ३६० आणि भोई समाज २३२ आहेत. उर्वरित १,१३० मतदार विविध समाजघटकांतील आहेत. त्यामुळे बारी आणि तेली समाजाचा एकत्रित कल कोणाच्या बाजूने झुकतो यावर या प्रभागातील निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. धार्मिक ध्रुवीकरण झाले तर भाजपाला फायदा होऊ शकतो, तर जातीय ध्रुवीकरण झाल्यास भाजपाला तोटा होईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.

प्रभागात फेरफटका मारल्यास मतदारांचा कल ‘काम करणाऱ्यां’कडे झुकताना दिसतो. अनेकांनी “विकासकामे आणि स्थानिक प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारालाच संधी द्यायची” अशी भूमिका व्यक्त केली. महिला मतदारांमध्ये योगिता भूषण चौधरी यांच्या कार्याचा चांगला प्रभाव दिसून येतो. त्या शासनाच्या विविध योजना प्रभागात राबवतात, तसेच त्यांच्या पती भूषण चौधरी हे भाजपचे जुने पदाधिकारी असल्यामुळे त्यांना पक्षीय बळ मिळणार आहे.

पुरुष जागेसाठी मात्र गोपाळ सुतार आणि अरुण आस्वार यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. दोघेही ओबीसी मतदारांमध्ये मजबूत पकड ठेवतात. काही मतदारांनी आस्वार यांना पाठिंबा जाहीर केला असला, तरी मोठा भाग गोपाळ सुतार यांच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही लढत अतिशय चुरशीची ठरणार असून, निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहू शकतो.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये हनुमान चौक, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, मंगरूळ दरवाजा, भोईवाडा, रथ गल्ली, बारीवाडा, मोमीनवाडा आणि दुर्गामाता मंदिर परिसराचा समावेश आहे. या भागातील प्रतिष्ठीत नागरिक – प्रकाश मुजुमदार, भागवत बारी, भूषण कासार, संजू भाई, सुभाष चौधरी, विजय लोहार – यांच्या समर्थनाची दिशा देखील निकालावर निर्णायक ठरणार आहे.

आता या प्रभागात दुर्गामाताचा आशीर्वाद कोणाच्या झोळीत पडतो आणि बारी-तेली समाज कोणाकडे झुकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound