जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी नुकतीच जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. हा प्रकार जरी विज्ञानवादाला धरून नसला तरी ही अंत्ययात्रा आटोपून ग्रामस्थ घराकडे परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली होती, हे विशेष.
सविस्तर माहिती अशी की, जुलै महिना अर्धा झाला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने हवालदील झालेल्या ग्रामस्थांनी पाऊस पडावा यासाठी पारंपारिक उपाययोजना करण्याचा विचार एकत्र येवून केला. त्याप्रमाणे गावातील रवींद्र हडपे यांनी स्वत:ची जिवंत अंत्ययात्रा काढण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास सगळी खऱ्या अंत्ययात्रेसारखी तयारी करून त्यांची अंत्ययात्रा गावातील स्मशानात नेण्यात आली. तेथे शोकसभाही घेण्यात आली. यावेळी गावातील डी.जे. वाल्याने विनामूल्य डी.जे. वाजवून साथ दिली. यावेळी ग्रामस्थ घराकडे परतत असताना जोरदार पाऊस सुरु झाल्याने वरुण राजा प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त होत होती. या अंत्ययात्रा कार्यक्रमाला गावातील सुरेश चिंचोरे, बाबा चिंचोरे, पिंटू चिंचोरे, मोहन पाटील, बापू पाटील, जितू राजपूत, रफिक बागवान, विक्रम कुंभार, जगदीश धनगर, संभाजी धनगर, भूषण चिंचोरे, मधुकर चिंचोरे, सोनू चिंचोरे व भिका बच्छाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.