Home Cities भुसावळ भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे इच्छुकांच्या मुलाखती

भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे इच्छुकांच्या मुलाखती


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे वरणगाव नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज भुसावळ येथे घेण्यात आल्या. या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून उमेदवारांनी आपल्या अर्जांसह पक्षाच्या कार्यालयात उपस्थिती लावली.

शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. वरणगाव नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने अखेर राजेंद्र चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी तसेच स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार संतोष चौधरी, खोडपे सर, विशाल नारखेडे, सचिन चौधरी, अशरफ खान, तसेच शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या मुलाखतींमुळे वरणगाव नगरपालिकेच्या राजकारणाला वेग आला असून, पुढील काही दिवसांत इतर पदांसाठीही उमेदवार निश्चित करण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचेही या बैठकीतून स्पष्ट झाले.

एकूणच, वरणगाव नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र चौधरी यांची उमेदवारी निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे.


Protected Content

Play sound