Home आंतरराष्ट्रीय पावसाने घातला अडथळा! पाचवा टी-२० सामना रद्द; भारताने २-१ ने मालिका जिंकली

पावसाने घातला अडथळा! पाचवा टी-२० सामना रद्द; भारताने २-१ ने मालिका जिंकली


ब्रिस्बेन – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ब्रिस्बेनच्या “द गाबा” मैदानावर रविवारी खेळावयाचा हा सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या २९ चेंडूंचाच खेळ होऊ शकला आणि नंतर वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने सामना पुढे खेळवता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावे केली आहे.

सामना सुरू होण्याआधीपासूनच हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. द गाबा स्टेडियममध्ये ७० टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि अखेर तसंच घडलं. सामन्यादरम्यान पावसाने काही काळ थांबा घेतला असला, तरी खेळ सुरु ठेवण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने अधिकृतरीत्या या निर्णयाची घोषणा केली आहे.

या सामन्यापूर्वी टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. तिसरा आणि चौथा सामना सलग जिंकून भारताने मालिकेवर आपली पकड मजबूत केली होती. त्यामुळे पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी होती, मात्र पावसाने भारताचा तो बेत हुकवला. तरीही भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकत एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली आहे.

एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला होता, परंतु या टी-२० मालिकेत भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन करत शानदार विजय मिळवला. मालिकेत युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आगामी स्पर्धांसाठी आत्मविश्वासात वाढ झाली आहे.

संपूर्ण मालिकेकडे पाहता, भारताने फलंदाजीत आणि गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला चांगले आव्हान दिले. पावसामुळे अखेरचा सामना रद्द झाला असला तरी, भारतीय संघाचा विजय आणि मालिकेवरील शिक्कामोर्तब क्रिकेटप्रेमींसाठी आनंददायी ठरला आहे.


Protected Content

Play sound