Home राजकीय रावेर नगरपालिकेच्या प्रभाग ४ मध्ये पुन्हा वाणी समाजाचाच दबदबा कि इतरांना संधी?

रावेर नगरपालिकेच्या प्रभाग ४ मध्ये पुन्हा वाणी समाजाचाच दबदबा कि इतरांना संधी?


रावेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये पुन्हा एकदा वाणी समाजाचा दबदबा दिसून येतोय. मागील चाळीस वर्षांपासून या प्रभागावर वाणी समाजाचे वर्चस्व राहिले असून, यंदाच्या निवडणुकीत देखील ‘वाणी विरुद्ध इतर’ अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या प्रभागात दत्तात्रय महाराज कोणाला पावतात, याकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे.

या प्रभागात वाणी समाजाचे वर्चस्व एवढे ठळक आहे की, इतर समाजातील उमेदवार या ठिकाणाहून उमेदवारी दाखल करायलाही धजावत नाहीत. वाणी समाजाच्या एकजुटीमुळे या प्रभागात दरवेळी एक पुरुष आणि एक महिला उमेदवार निश्चित केला जातो आणि संपूर्ण समाज त्यांच्यामागे ठामपणे उभा राहतो. मागील निवडणुकीत संगीता शिरीष वाणी बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर यशवंत दलाल अपक्ष म्हणून विजयी झाले होते.

यंदा या प्रभागातील सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून अमोल पाटील, निलेश पाटील, महेश अत्रे, भास्कर महाजन, आणि यशवंत दलाल हे इच्छुक आहेत. अपक्ष म्हणून मुन्ना अग्रवाल, राजू हरीभाऊ महाजन, आणि आर. डी. वाणी आपली ताकद आजमावण्यास इच्छुक आहेत. तर महिला ओबीसी जागेवरून भाजपकडून अर्चना योगेश पाटील, श्रद्धा मनोज श्रावग, आणि रुपाली यशवंत दलाल यांची नावे चर्चेत आहेत.

या प्रभागात एकूण ३०४८ मतदार आहेत, त्यापैकी ४८३ वाणी समाजाचे, ९५५ मुस्लिम मतदार, तर उर्वरित मतदार विविध समाजातील आहेत. या भागात भोकरिकर गल्ली, लंगडा मारुती परिसर, संत रोहिदास नगर, डे सारर्डा जिम परिसर, गजानन नगर, अप्पू गल्ली, गांधी चौक, मेन रोड, आणि बावीशी गल्ली यांचा समावेश होतो.

प्रभागातील मतदार सध्या विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना “स्वच्छता, पाणीपुरवठा आणि चांगले रस्ते” ही प्राथमिक गरज असल्याचे सांगितले. काही मतदारांनी अमोल पाटील यांच्याबद्दल स्पष्ट पाठिंबा दर्शवला, तर काहींनी मुन्ना अग्रवाल यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

यंदाच्या निवडणुकीत शिरीष वाणी सर, राजा मिसर सर, नितीन सैतवाल, अशोक वाणी, आणि पत्रकार सुनिल चौधरी यांसारख्या प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळतो, हेच या प्रभागातील विजयाचे गणित ठरवणार आहे. त्यामुळे वाणी समाजाची परंपरा कायम राहते की नवख्या उमेदवारांना संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Protected Content

Play sound