Home क्राईम बहादरपुर येथील यात्रेतून चोरलेली मोटारसायकल पोलिसांनी केली जप्त :आरोपीला अटक

बहादरपुर येथील यात्रेतून चोरलेली मोटारसायकल पोलिसांनी केली जप्त :आरोपीला अटक


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी श्री बद्रीनाथ महाराज यात्रा उत्सव सुरू असताना, यात्रेच्या गर्दीतून एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती. अल्पावधीतच पारोळा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून मोटारसायकल जप्त केली असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी फिर्यादी भटु विष्णु पाटील (वय 49,रा.ओम नगर,पारोळा) हे त्यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीएफ 6675) घेऊन बहादरपुर येथे यात्रा पाहण्यासाठी गेले होते.संध्याकाळी सुमारे सहा वाजता त्यांनी आपली मोटारसायकल सोमनाथ रामचंद्र चौधरी यांच्या घरासमोर उभी करून यात्रा पाहण्यासाठी निघाले.रात्री आठच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकल त्या ठिकाणी आढळली नाही.त्यांनी परिसरात शोध घेतला,मात्र मोटारसायकल सापडली नाही. अखेर त्यांनी पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 272/2025 भारतीय दंड संहिता कलम 379 नुसार नोंदविण्यात आला.

या घटनेचा तपास पोलीस हवालदार प्रविण पाटील करत होते.गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी मा.डॉ.महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक जळगाव यांनी विशेष आदेश दिले होते. तसेच मा.श्रीमती कविता नेरकर-पवार (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव विभाग) व मा.श्री.विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी,अमळनेर विभाग) यांनी देखील तपासाला गती देण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या होत्या.

या आदेशांनुसार पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की वडगाव (ता. पारोळा) येथील संदीप नाना भील (वय 20) हा व्यक्ती संबंधित मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात सामील आहे. पोलिसांनी अमोल दुकळे (पोलीस उपनिरीक्षक), सुनिल हाटकर, प्रविण पाटील, अनिल राठोड आणि अशिष गायकवड या पथकाला तपासासाठी रवाना केले.

तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 35,000 रुपयांची हिरो होंडा मोटारसायकल हस्तगत केली आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बहादरपुर येथील यात्रेतून चोरलेली मोटारसायकल पारोळा पोलिसांनी अल्पावधीत शोधून काढली. गुन्हे उकलण्यात पोलिसांचे तत्पर व संयोजित कामकाज अधोरेखित झाले असून, स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound