Home Cities जळगाव सेवेत हलगर्जीपणा भोवला! ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

सेवेत हलगर्जीपणा भोवला! ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

0
529


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेतील हलगर्जीपणा आणि कार्यातील अनास्था दाखवल्याबद्दल तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या संदर्भात निलंबनाचे आदेश जारी केले असून, प्रशासनातील उत्तरदायित्व आणि शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर कर्मचारी वैद्यकीय देयकांच्या कार्यासनाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांवर आवश्यक ती मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांची नोंद न घेता, थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली होती. तसेच संबंधित कामकाज वेळेत न पूर्ण करणे, अपूर्ण ठेवणे आणि नियमांचे पालन न करणे असे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार त्यांच्या कडून आढळून आले.

या सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर अमजद खान यांचे वर्तन नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाले. प्रशासकीय प्रक्रिया व शिस्तभंगाच्या संदर्भात हे कृत्य गंभीर मानले जात असून, त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिस्तभंग कारवाईचा हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्पष्ट केले की, “जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त या अत्यावश्यक आहेत. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा, नियमभंग किंवा प्रशासकीय दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.” त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातील कर्मचाऱ्यांना कामकाजात अधिक जबाबदारीने आणि दक्षतेने वागण्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.

ही कारवाई प्रशासनातील उत्तरदायित्व वाढविणारी आणि शिस्तबद्ध कामकाजाला प्रोत्साहन देणारी ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.


Protected Content

Play sound