मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील चर्चित जोडी जय भानुशाली आणि माही विज यांच्या वैवाहिक नात्यात आलेल्या ताणामुळे आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर आला आहे. १४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चांदरम्यान माही विजने केलेला ताज्या वक्तव्याने सोशल मीडियावर नवे वादंग निर्माण केले आहे.

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये माही विजला ५ कोटी रुपयांची पोटगी मिळाल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत होती. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत माही विजने स्वतःच स्पष्ट केलं – “तुमच्याकडे पुरावे असतील तर बोला. पोटगीबद्दल मला काहीच माहिती नाही. एक पुरुष पैसे कमवत असतो, पण त्याच्या कमाईवर एका महिलेचा हक्क नसतो. ही गोष्ट फक्त माझ्या वैयक्तिक जीवनाशी नाही, तर समाजासाठीदेखील आहे,” असं ती म्हणाली.

माही पुढे म्हणाली, “जर एखादी महिला स्वतः काम करते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तर ती सर्वार्थाने सक्षम आहे. पोटगी त्या महिलांना मिळते, ज्यांनी कधी काम केलेलं नाही किंवा ज्यांच्याकडे स्वतःचा आर्थिक आधार नाही. पण आजच्या काळात महिलांनी वडिलांच्या किंवा नवऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहू नये. त्यांनी स्वतः मेहनत करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं.”
तिने जनतेलाही आवाहन केलं की, “कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडून ऐकल्याशिवाय कोणतीही बातमी खरी मानू नका. मार्ग वेगळे झाले तरी, प्रत्येक स्त्रीने स्वतः कमावावं, स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतः घ्यावा.”
शेवटी माही विज म्हणाली, “आपल्या गोपनीयतेचा, आमच्या मुलांच्या आणि पालकांच्या गोपनीयतेचा आदर करा. जय माझं कुटुंब आहे आणि कायम राहील. तो माझ्या मुलांचा वडील आहे आणि एक चांगला व्यक्ती आहे.”
जय भानुशाली आणि माही विज यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला होता. त्यांच्या तारा नावाच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. या चर्चांनी पुन्हा एकदा ग्लॅमर जगतातील नात्यांची गुंतागुंत आणि प्रसिद्धीच्या दडपणाचं वास्तव अधोरेखित केलं आहे.
या घटनेनंतर माही विजच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं की, ती केवळ स्वतःच्या नात्याबद्दलच नाही तर महिलांच्या स्वावलंबनाबद्दलही ठाम भूमिका मांडत आहे. तिचा संदेश – “स्वतः कमवा, स्वतः उभे राहा आणि अफवांपासून दूर राहा” – अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.



