Home धर्म-समाज दीपनगरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

दीपनगरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखंड भारताचे शिल्पकार आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दीपनगर वसाहतीत उत्साह आणि एकतेचा अनोखा संगम दिसून आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीकडून या निमित्ताने विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात एकतेचा संदेश देणारा हा उत्सव नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे अधिकच भव्य ठरत आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला आहे. 6 ते 15 वयोगटातील मुलांसाठी चित्रकला, निबंध, सुई-दोरा, स्लो सायकल आणि लिंबू-चमचा अशा मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर महिलांसाठी संगीत खुर्ची आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येऊन उत्सवात स्त्रीशक्तीचा सहभागही अधोरेखित करण्यात आला आहे.

सामाजिक संवेदनशीलतेचा उत्तम प्रत्यय देत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीकडून 30 ऑक्टोबर 2025 रोजी बोदवड येथील आत्मसन्मान मनोरुग्ण संस्थेत अन्नदान आणि गादी-पलंग भेटवस्तू समारंभ पार पडला. या उपक्रमामुळे समाजसेवेचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

दरम्यान, उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता समाजप्रबोधक व कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील बार्शीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तनातून राष्ट्रभक्ती, अखंडता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे.

याशिवाय, क्रीडा क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी ‘युनिटी चषक 2025’ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले असून, स्थानिक तरुणाई या सामन्यांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहे.

या सर्व उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी सरदार वल्लभ भाई पटेल उत्सव समिती दीपनगर यांचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव,सहसचिव आणि सर्व सभासद या सर्वांनी एकजुटीने पार पाडली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण दीपनगर परिसर देशभक्तीच्या आणि सामाजिक एकतेच्या भावनेने उजळून निघाला आहे.

या जयंती उत्सवाचे सर्व कार्यक्रम समाजातील विविध घटकांना एकत्र आणत अखंड भारताच्या संकल्पनेची जाणीव करून देणारे ठरत आहेत.


Protected Content

Play sound