जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ पत्रकार दिलीप मनोरमा केशवलाल तिवारी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावतर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. आज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. तिवारी यांना अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, मार्गदर्शक प्रा. डॉ. सुधीर भटकर, संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव प्रविण चंदनकर, डॉ. सोमनाथ वडनेरे व सुभाष तळेले उपस्थित होते.
कबचौउमवि (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) च्या आंतरविद्याशाखीय जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत श्री. तिवारी यांनी सादर केलेल्या ८५० पानांच्या प्रदीर्घ संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय होता ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ – जळगाव जिल्हा)’.

या प्रबंधात जळगाव जिल्ह्यातील केळी लागवडीच्या प्रक्रियेत नवतंत्रांचा वापर, शेतकऱ्यांकडून बहुमाध्यमांद्वारे घेतली जाणारी कृषी माहिती, तिचा उत्पादन आणि उत्पन्नवाढीवर झालेला परिणाम, तसेच उत्पन्नवाढीमुळे बदललेले शेतकऱ्यांचे जीवनमान – या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
संशोधनात विशेषतः हे अधोरेखित करण्यात आले आहे की, बहुमाध्यम वापरामुळे केळी उत्पादक शेतकरी केवळ शेतीत नवतंत्राचा अवलंब करत नाहीत, तर त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमानही लक्षणीयरीत्या सुधारले आहे. प्रश्नावली आणि मुलाखतींच्या आधारे केलेल्या विश्लेषणातून या परिवर्तनाची ठोस आकडेवारी सादर करण्यात आली आहे.
श्री. तिवारी यांनी त्यांच्या संशोधनात जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. या कंपनीचे कृषी नवतंत्र प्रसारातील योगदानही नोंदवले आहे. केळी लागवडीतील बदल, उत्पादनवाढ, आणि नवतंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर या सर्व घटकांवर त्यांनी बारकाईने प्रकाश टाकला आहे. या अभ्यासाद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील बदलांचे वैज्ञानिक विश्लेषण सादर करण्यात आले आहे.
सन १९८९ नंतर जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीवर आधारित असे व्यापक संशोधन हे पहिल्यांदाच सादर झाले असून, या कार्यामुळे ग्रामीण विकासाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक दस्तऐवज तयार झाल्याचे मानले जाते.



