जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे “रन फॉर युनिटी” या एकात्मतेच्या धावण्याचा उपक्रम शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उत्साहात पार पडला. शहरातील सागर पार्कपासून या धावण्याला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. देशातील एकात्मतेचे आणि ऐक्याचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ही धाव आयोजित करण्यात आली होती.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“रन फॉर युनिटी”च्या माध्यमातून नागरिकांना देशातील एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहभागी धावपटूंनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमवला. या उपक्रमामुळे समाजात एकात्मतेचा संदेश दृढ करण्यास हातभार लागला. जळगाव पोलिसांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



