फलटण,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली आणि गेल्या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही महिला डॉक्टर संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी आता अनेकजण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी घटनास्थळास भेट देत पोस्टमॉर्टेम आणि तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टेम अहवालात अनेक त्रुटी असून, या प्रकरणातील प्रक्रिया संशयास्पदरीत्या पार पाडण्यात आल्याचे दिसते. डॉक्टरच्या भावाला शवविच्छेदनावेळी उपस्थित राहू देण्यात आले नाही, ही मोठी चूक असल्याचे त्या म्हणाल्या. इन-कॅमेरा पोस्टमॉर्टेमची मागणी करण्यात आली होती, पण ती मान्य करण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर या प्रकरणातील एफआयआर नोंदवायला तब्बल आठ तास लागले, तर ऊसतोड कामगारांच्या प्रकरणात दोन मिनिटांत गुन्हे दाखल होतात, अशी तीव्र टीका अंधारे यांनी केली.

त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात स्वतः संवाद साधला असून, महिला आयोगावर आवश्यक कारवाई होईल असा शब्द दिला आहे. उद्धव ठाकरे यांनीही पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधून कायदेशीर लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. “हे ऊसतोड कामगाराचे लेकरू कर्तृत्ववान होते. या घटनेने सरकार आणि व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे,” असे वक्तव्य अंधारे यांनी करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
अंधारे यांनी स्पष्ट केले की, आम्ही केवळ नाराजी व्यक्त करून थांबणार नाही. दोन तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टीमेटम देत आहोत. जर तोपर्यंत योग्य ती कारवाई झाली नाही, तर तीन तारखेला आम्ही फलटण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. तटकरे यांनी आपले पद कायम ठेवले तर ते प्रशासनातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह आहे, असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणाने आता केवळ आत्महत्येचा तपास न राहता, न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न उभा केला आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या मृत्यूचे गूढ आणखी गडद झाले असून, हा खरोखरच आत्महत्येचा प्रकार होता की नियोजित हत्या, याबाबत राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.



