Home Cities जळगाव ११ महिने कॉन्ट्रॅक्ट नियुक्ती लागू करा; प्राध्यापक संघटनेची मागणी

११ महिने कॉन्ट्रॅक्ट नियुक्ती लागू करा; प्राध्यापक संघटनेची मागणी


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खानदेश उच्चशिक्षित पात्रता प्राध्यापक संघटनेच्या वतीने जळगाव येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांना CHB (Clock Hour Basis) प्राध्यापकांच्या समस्यांविषयी आणि त्यांच्यासाठी ११ महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियुक्तीची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी संघटनेच्या प्रतिनिधींनी तब्बल एक तास सविस्तर चर्चा केली.

चर्चेदरम्यान डॉ. मसराम यांनी प्राध्यापकांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, शिक्षकवर्गाच्या प्रश्नांबाबत विभागात योग्य पातळीवर चर्चा होईल आणि न्याय्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

संघटनेने सादर केलेल्या मागण्यांमध्ये प्राध्यापकांची शंभर टक्के भरती तातडीने करण्यात यावी, सध्याच्या CHB पद्धतीऐवजी ११ महिन्यांच्या करारावर नियुक्ती केली जावी, तसेच प्राध्यापकांना मासिक ७० ते ८० हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशा मागण्या समाविष्ट आहेत. त्याचबरोबर CL (Casual Leave), DL (Duty Leave) रजा आणि आरोग्य विमा योजना प्राध्यापकांना लागू कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली.

संघटनेचे म्हणणे आहे की, शंभर टक्के नियमित भरती शक्य नसलेल्या ठिकाणी किमान ११ महिने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पात्र प्राध्यापकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो आणि विद्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान होते.

या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पुणे येथील शिक्षण सहसंचालकांकडेही पाठवली जाणार असून, यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची भेट घेऊनही संघटना मागणी सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कोळी, उपाध्यक्ष विनोद भालेराव, सचिव प्रा. खिलेश पाटील, प्रा. गिरीश सरोदे, प्रा. गौतम भालेराव, प्रा. पंकज फालक, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. प्रदीप तायडे, डॉ. सचिन कुंभार, प्रा. गोपीचंद धनगर, डॉ. गुलाब तडवी, प्रा. राजेश धुंदले, प्रा. रत्नाकर कोळी आणि प्रा. निलेश कोळी यांसह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.


Protected Content

Play sound