जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने एक उत्साहवर्धक पाऊल टाकण्यात आले आहे. “निक्षय मित्र नोंदणी अभियान” या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १३३३ ‘निक्षय मित्रांची’ नोंदणी पूर्ण झाली आहे. या माध्यमातून क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण, मानसिक आणि सामाजिक आधार मिळत आहे.

क्षयरोगमुक्त भारत या राष्ट्रीय मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांना “निक्षय मित्र” म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १३१३ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करून या सामाजिक चळवळीत हातभार लावला आहे.

‘निक्षय मित्र’ या संकल्पनेखाली प्रत्येक स्वयंसेवक किंवा संस्था एका क्षयरोगग्रस्त रुग्णाला उपचारकाळात पोषण आहार, औषधोपचारासाठी मानसिक आधार आणि आवश्यक सामाजिक मदत पुरवते. या माणुसकीच्या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये उपचारांबाबत आत्मविश्वास वाढतो, तर समाजात आरोग्यविषयक जागरूकतेचे नवे उदाहरण निर्माण होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या, “क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यावश्यक आहे. निक्षय मित्र म्हणून सहभागी होणे म्हणजे समाजातील सर्वात दुर्बल घटकासाठी हात पुढे करण्याचा मानवी दृष्टिकोन जोपासणे होय.”
दरम्यान, जिल्हा क्षयरोग विभागामार्फत हे अभियान सातत्याने राबवले जात आहे. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून अधिकाधिक नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करावी आणि क्षयरोगमुक्त जळगाव घडविण्याच्या आरोग्यदायी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



