रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील हे त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे आणि रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या वृत्तीमुळे परिसरात नेहमीच चर्चेत असतात. ‘अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करून त्यांचा जीव वाचवणे’ हे जणू माऊली फाउंडेशनचे ब्रीदवाक्यच बनले आहे. याच ब्रीदवाक्याचे पालन करत डॉ. पाटील यांनी काल सायंकाळी पुन्हा एकदा दोन गंभीर जखमी अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’ ठरले आणि त्यांच्या समयसूचकतेमुळे दोघांचे प्राण वाचले.
सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास डॉ. संदीप पाटील हे आपल्या गाडीतून रावेरकडून भुसावळकडे जात होते. निंभोरा फाट्याजवळ त्यांना रस्त्यावर एक अपघात झालेला दिसला. मोटरसायकल (क्रमांक MH 19 BX 1918) स्वार दोन व्यक्ती अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर पडल्या होत्या. क्षणभरही विलंब न करता डॉ. पाटील यांनी आपली गाडी थांबवली.

रस्त्यावरच केले तातडीचे उपचार: अपघातात सावदा येथील शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील हे बेशुद्धावस्थेत होते, तर त्यांच्यासोबत असलेले रोझोदा येथील सुनील राणे यांच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली होती आणि ते गंभीर जखमी झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. पाटील यांनी तात्काळ आपल्या गाडीतील प्रथमोपचार पेटी बाहेर काढली आणि रस्त्यावरच बसून दोन्ही जखमींवर तातडीचे उपचार सुरू केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या मिलिंद पाटील यांना तातडीने उपचार मिळाल्याने ते शुद्धीवर आले. सुनील राणे यांच्या जखमांवरही त्वरित प्रथमोपचार करण्यात आले.
डॉ. पाटील यांच्या या तातडीच्या व अचूक उपचारामुळे दोन्ही अपघातग्रस्तांचे जीव वाचले. उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी डॉ. संदीप पाटील यांना माऊली हॉस्पिटलचे कर्मचारी किशोर कोळी (सुलवाडी), पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे, विवरा येथील राम वाघ यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी मदत केली. रस्त्यावरील या आपत्कालीन परिस्थितीत डॉ. पाटील यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे व माणुसकीच्या भावनेचे उपस्थितांनी आणि परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले आहे.



