जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातल्या शिवरामनगर भागात असलेल्या बंगल्यातुनन चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
क्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मालकीचा जळगाव शहरातल्या शिवरामनगर या भागात मुक्ताई नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती आज सकाळी समोर आल्याने खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार नाथाभाऊ अथवा त्यांच्या घरातील कोणताही सदस्य या बंगल्यात उपस्थित नसतांना चोरट्यांनी येथे हात साफ केला आहे. स्वत: आमदार खडसे हे बाहेरगावी असून बंगल्याला कुलूप लावलेले होते. याचीच संधी साधून चोरट्यांनी डाव साधल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

चोरट्यांनी घराच्या गेटला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केल्याचेही दिसून आले. सकाळी ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली. येथे लागलीच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. या पथकातील श्वानाने घराच्या बाहेर चोरटे मुख्य मार्गाने निघून गेल्याचे दाखविले. तर याची माहिती मिळताच आमदार खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ येथे धाव घेतली.
आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना चोरट्यांनी सुमारे सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती दिली. भर नागरी वस्तीत असलेल्या खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस तपासात नेमके काय होणार हे आता पुढे समजणार आहे.
लक्षणीय बाब म्हणजे खडसेंच्या सुनबाई तथा केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर बंदुकधाऱ्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली असतांनाच आता चोरट्यांनी जळगावातील बंगल्यात चोरी केल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे.



