मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफाट विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे आज (25 ऑक्टोबर) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. 74 वर्षीय या दिग्गज कलाकाराने किडनीच्या आजाराशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

सतीश शहा यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी आज दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास झाली. त्यांच्या पार्थिवावर उद्या (26 ऑक्टोबर) मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

‘जाने भी दो यारो’ या 1983 मधील प्रसिद्ध व्यंगचित्रपटातून सतीश शहा घराघरात पोहोचले. त्यांच्या विविध भूमिकांनी आणि टायमिंगने त्यांना भारतीय सिनेमातील सर्वोत्तम विनोदी कलाकारांच्या यादीत स्थान मिळवून दिलं. ‘हम साथ-साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेक्षकांना हसवतानाच भावनांनी ओथंबून टाकलं. प्रत्येक पात्रात त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली.
दूरदर्शनवरही सतीश शहा यांनी लोकप्रियतेचा नवा इतिहास रचला. 1984 मध्ये प्रसारित झालेल्या ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर आपली छाप पाडली. मात्र, ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील इंद्रवदन साराभाई ही त्यांची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे. त्यांच्या सडेतोड संवादफेकीने आणि हसवणाऱ्या स्वभावाने ही भूमिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात अमर झाली.
सतीश शहा यांच्या निधनाने मनोरंजनविश्वाने केवळ एक उत्तम अभिनेता गमावलेला नाही, तर विनोद, हजरजबाबीपणा आणि संवेदनशीलतेचा एक जिवंत खजिना हरवला आहे. त्यांच्या कलाकृती, संवाद आणि व्यक्तिरेखा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.



