जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वित्तीय सेवा विभाग आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे ‘आपला पैसा आपला अधिकार’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेली मालमत्ता कार्यक्षम आणि जलद गतीने तिच्या मूळ वारसदारांपर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजुमामा भोळे यांची उपस्थिती होती. तसेच, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल व्यवस्थापक प्रवीण कुमार सिंग, बँक ऑफ बडोदाचे डीआरएम सुरेश खैरनार, आरबीआयचे लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर निशांत यादव, अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक अनुराग मिश्रा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे डीआरएम अमर गजभिये आणि महेंद्र जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘तुमचे पैसे तुमचा हक्क’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या पुस्तिकेमुळे नागरिकांना दावा न केलेल्या मालमत्तेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर जयदीप देठे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.



