काठमांडू – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिवाळी म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर लक्ष्मीपूजन, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांचा आवाज येतो. पण भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी साजरी करण्याची पद्धत थोडी वेगळी आणि विशेष आहे. येथे ‘तिहार’ नावाचा हा सण पाच दिवस साजरा केला जातो आणि यामध्ये एक दिवस असा असतो ज्या दिवशी कुत्र्यांची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी कुत्र्यांना देवतांसारखा मान दिला जातो. त्यांना टिळा लावला जातो, फुलांचे हार घालून त्यांच्या पायांवर नतमस्तक होऊन श्रद्धेने पूजा केली जाते.
‘कुकुर तिहार’ नावाने ओळखला जाणारा हा दिवस मानवी आणि प्राण्यांमधील सहअस्तित्वाचा आदर्श उदाहरण ठरतो. ज्या कुत्र्यांकडे अनेक ठिकाणी उपद्रवी किंवा उपेक्षित नजरेने पाहिलं जातं, त्यांच्याच पवित्र भावनेने पूजा करणे हे माणुसकीचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवणारं आहे. या दिवशी कुत्र्यांसाठी खास पक्वान्न तयार केले जातात – त्यांना अंडी, दूध, दही यांसारखे पौष्टिक पदार्थ खायला दिले जातात. काही कुटुंबे तर कुत्र्यांसाठी नवीन कपडे किंवा शोभेच्या वस्तूही आणतात.

कुकुर तिहार साजरा करण्यामागे एक धार्मिक श्रद्धा आहे – की कुत्रे हे यमराजांचे म्हणजेच मृत्यूच्या देवतेचे दूत असतात. असे मानले जाते की, कुत्रे मृत्यूनंतर आपल्या मालकाचे रक्षण करतात आणि त्याचा मार्गदर्शक होतात. यामुळेच त्यांच्या पूजनाला तिहारच्या दुसऱ्या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते. ही श्रद्धा फक्त धार्मिक मर्यादेत न राहता माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याचा गौरवही करते.
नेपाळमध्ये साजऱ्या होणाऱ्या तिहार सणाच्या दरम्यान, पाच दिवस वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा केली जाते – कावळे, कुत्रे, गाय, बैल आणि शेवटी आप्तेष्टांसह ‘भाई टिका’ म्हणजे भाऊबीज. प्रत्येक दिवशी एखाद्या प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याचे स्मरण केले जाते. ही परंपरा केवळ धार्मिकता नव्हे, तर सजीवांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक मानली जाते.
दिवाळीचा आनंद प्रकाश, श्रीमंती आणि यशाचा असतो, पण नेपाळचा ‘कुकुर तिहार’ या आनंदामध्ये एक वेगळीच भावनिक आणि करुणामय बाजू जोडतो. माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं केवळ उपयोगापुरतं मर्यादित नसून त्यातही प्रेम, आदर आणि निष्ठा असू शकते, हे नेपाळच्या या सणातून शिकण्यासारखं आहे.



