जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आयुर्वेद शास्त्राच्या जनक देवता धन्वंतरींच्या पूजनाने कॉलेज परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारला होता.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी यागाने झाली. यामध्ये डॉ. उमाकांत चौधरी यांनी सहपत्निक सहभागी होत धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतरडॉ. मयुरी चौधरी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन संपन्न झाले. त्यांनी श्रद्धेपूर्वक धन्वंतरी स्तोत्राचे पठण करून उपस्थितांना अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला.

यानंतर डॉ. मुकेश चौधरी यांनी संहितेतील आयुर्वेदाच्या तत्त्वांचा वाचन करून प्राचीन वैद्यकीय परंपरेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आयुर्वेद हे फक्त उपचारशास्त्र नसून जीवनशैली घडविणारे शास्त्र आहे, असा संदेश दिला.
या कार्यक्रमात कॉलेज व हॉस्पिटलमधील विद्यार्थी, शिक्षक आणि नॉन-टीचिंग स्टाफ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागामुळे वातावरण धार्मिक आणि प्रेरणादायी बनले होते. पारंपरिक वेशभूषा, मंत्रोच्चार आणि पूजन विधीमुळे कॉलेज परिसरात अध्यात्मिक तेज प्रकटले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयुर्वेदाच्या तत्वज्ञानावर आधारित संदेश देत सर्वांनी निरोगी जीवनशैली अवलंबण्याची आणि धन्वंतरींच्या आरोग्यदायी मार्गावर चालण्याची शपथ घेतली.



