जळगाव प्रतिनिधी । उत्तमराव महाजन यांना खंडणी मागण्यासाठी डांबून ठेवण्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी मनोज लोहार यांच्यासह आज धीरज येवले यांना न्यायालयाने दोषी जाहीर केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण प्रचंड गाजले होते. ही घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. या प्रकरणी प्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. तर धीरज येवेल यांनी त्यांची मदत केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हा खटला प्रदीर्घ काळापर्यंत जळगाव न्यायालयात चालला.
यावर आज कोर्टाने निकाल देत तत्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक आणि सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधिक्षक मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. येत्या १९ जानेवारीला दोन्ही दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.