Home प्रशासन तहसील बोदवड पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर 

बोदवड पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर 


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, बोदवड येथे आरक्षण सोडत प्रक्रिया नियमानुसार शांततेत पार पडली. ही प्रक्रिया मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना नव्याने दिशा मिळणार आहे.

या आरक्षण सोडतीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती जयश्री माळी (विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव) होत्या. तर कार्यक्रमाचे संचालन बोदवडचे तहसीलदार अनिल वसंत पुरे यांनी केले. एकूण ४ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. लहान बालिका सांची सचिन पालवे (वय ४ वर्षे, बोदवड) हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण प्रक्रिया पार पडली. ही एक विशेष आकर्षणाची बाब ठरली.

आरक्षणानुसार ४१ नाडगाव आणि ४२ मनुर बु. या गटांसाठी अनारक्षित (सर्वसाधारण) वर्गात जागा आरक्षित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (महिला) साठी ४३ साळशिंगी गट, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी ४४ शेलवड गट आरक्षित ठरला आहे. विशेष म्हणजे यावेळी अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित झालेली नाही.

सोडत प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे पारदर्शकतेच्या निकषांची पूर्तता झाली असून स्थानिक राजकीय व सामाजिक गटांमध्ये यामुळे पुढील हालचालींना वेग येणार आहे.


Protected Content

Play sound