Home अर्थ जिल्हा बँकेची नोकर भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत घ्या : छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

जिल्हा बँकेची नोकर भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत घ्या : छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने मोठी मागणी पुढे केली आहे. त्यांनी ही संपूर्ण भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात घेण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली असून, त्यासाठी सहकार सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि महामहीम राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने नोकरभरतीसाठी मंजुरी दिल्यानंतर, या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची खात्री करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे प्रवक्ते दीप पाटील यांनी सांगितले की, ही भरती अशा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात यावी ज्या पारदर्शक आणि निष्पक्षपणे काम करतात. मात्र, या भरतीवर बँकेच्या सध्याच्या संचालक मंडळाचा प्रभाव राहू नये, यासाठी सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले जावे.

संचालक मंडळावर संशय घेण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी नमूद केलं की, संचालक मंडळाने कोणतीही गरज नसताना जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘दगडी बँक’ इमारतीसारखी ऐतिहासिक मालमत्ता अतिशय कमी दराने विक्रीस काढण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारभावानुसार सुमारे ६५ कोटींची किंमत असलेल्या इमारतीस केवळ २२ कोटी रुपये किंमत लावून विक्री करण्याच्या निर्णयावर जळगावचे पालकमंत्री यांनी थेट आक्षेप घेतला आहे.

या विरोधातून हे स्पष्ट होते की, राज्य सरकारलाही संचालक मंडळावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे संचालक किंवा बँकेतील इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ही भरती जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत पार पाडावी, जेणेकरून भविष्यात शासनाची आणि प्रशासनाची बदनामी होणार नाही.

शिवाजी ब्रिगेडने अशी भूमिका मांडली की, हुशार आणि पात्र उमेदवारांनाच संधी मिळावी, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी भरतीची प्रक्रिया पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच पार पडावी. यासाठी त्यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती सादर केली आहे.


Protected Content

Play sound