
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत कार्यालयात ३० सप्टेंबर रोजी आयोजित मासिक सभेत व्यायामशाळेसाठी जागा देण्याच्या कारणावरून मोठा वाद होऊन काही जणांनी गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर, उपस्थित महिला सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी व दमदाटी केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल १० दिवसांनंतर शुक्रवारी (१० ऑक्टोबर) रात्री ९ वाजता नंदगाव येथील सात जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मासिक सभेत गोंधळ:
नंदगाव ग्रामपंचायत कार्यालयात ३० सप्टेंबर रोजी सरपंच स्वाती भूषण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरू होती. या सभेला उपसरपंच पूजा योगेश पाटील आणि सदस्य पांडुरंग नाटू पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सभा सुरू असतानाच स्वप्निल सोनवणे, कल्पेश लक्ष्मण सोनवणे, जितेंद्र भास्कर बाविस्कर, रितेश प्रकाश सोनवणे, अक्षय राजेंद्र सोनवणे, गणेश ज्ञानेश्वर सोनवणे (सर्व रा. नंदगाव) या सहा ते सात संशयितांनी बेकायदेशीररित्या सभेत प्रवेश केला.
महिला पदाधिकाऱ्यांचा अपमान:
व्यायामशाळेसाठी जागा देण्याच्या मुद्द्यावरून संशयितांनी सभेत प्रचंड गोंधळ घातला. महिला सरपंच स्वाती पाटील यांचा अपमान करण्याच्या हेतूने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. तसेच, “तुला व्यायामशाळेसाठी जागा द्यायची आहे की नाही? तुझ्या बापाची जागा आहे का? तुला घरून द्यायची आहे का?” असे धमकावत “तुम्ही बाहेर या, तुम्हाला आम्ही पाहून घेतो,” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आली. यामुळे सभेत प्रचंड तणाव निर्माण झाला.
गुन्हा दाखल:
या गंभीर घटनेनंतर सरपंच स्वाती पाटील यांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी वरील सहा संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ) दीपक चौधरी हे करीत आहेत.



