Home Cities जळगाव जळगावात वर्सी महोत्सवाला भव्य सुरुवात; ८० जोडप्यांच्या हस्ते विश्वशांती यज्ञ

जळगावात वर्सी महोत्सवाला भव्य सुरुवात; ८० जोडप्यांच्या हस्ते विश्वशांती यज्ञ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात दरवर्षी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या अमर शहीद संत कविराम व संत हरदास राम यांच्या वर्सी महोत्सवाला आज, शुक्रवार १० ऑक्टोबरपासून भव्य आणि भक्तिमय सुरुवात झाली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, संपूर्ण जळगाव शहर भक्तिमय वातावरणात न्हालं आहे.

आज पहाटे देवरी साहेबांच्या समाधीस्थळी पंचामृत स्नानाने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर सकाळी ९ वाजता ८० नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते विश्वशांती यज्ञ पार पडला. हा यज्ञ पूज्य सेवा मंडळाच्या प्रांगणात धुळे येथील प.पू. लेखराज यांचे सुपुत्र यांच्या वेदघोषामध्ये पार पडला. यज्ञासाठी आलेल्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारीच स्वागत मंडप उभारण्यात आला होता आणि संत तुकाराम नगरमार्गे ट्रस्टच्या सेवा मंडळापर्यंत वाहतूक सेवा पुरवण्यात आली.

यंदाच्या वर्षी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे, नव्याने उभारण्यात आलेली सेवा मंडळाची इमारत. येथे भाविकांसाठी भोजन, विश्रांती व पूजेसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिंधी कॉलनी परिसरात भव्य मंडपाची उभारणी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण वातावरण उजळून निघाले आहे.

हा वर्सी महोत्सव अमर शहीद संत कविराम साहेब यांचा ६८ वा, संत बाबा हरदास राम यांचा ४८ वा आणि बाबा गेले राम यांचा १७ वा महोत्सव आहे. पूज्य कविर नगर सिंधी पंचायत आणि अमर शहीद संत कविर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दिवसभरात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सकाळी ११ वाजता सेवा मंडळाच्या नूतन इमारतीत ट्रस्टच्या कार्याचा आढावा आणि भोजन मंडळाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता भाविकांसाठी सत्संग, आणि संध्याकाळी ७ वाजता अखंड पाठसाहेबांचा प्रारंभ होणार आहे. यानंतर संत बाबा हरदास राम व बाबा गेले राम यांच्या जीवनावर आधारित भजन व नाटिका सादर केली जाणार आहे.

संपूर्ण जळगाव शहरात या महोत्सवामुळे भक्तिभावाचे वातावरण पसरले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले श्रद्धाळू या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होत असून ट्रस्टच्यावतीने त्यांची योग्य ती सोय करण्यात येत आहे. वर्सी महोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सेवाभाव आणि आध्यात्मिकतेचा संगम जळगावमध्ये अनुभवायला मिळत आहे.


Protected Content

Play sound