Home Cities अमळनेर रस्त्यावर सापडलेली बॅग केली परत; प्रामाणिक नागरिकाचा सन्मान 

रस्त्यावर सापडलेली बॅग केली परत; प्रामाणिक नागरिकाचा सन्मान 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण ठरले आहेत अमळनेर तालुक्यातील बोहरा गावाचे रहिवासी प्रकाश ओंकार पाटील. रस्त्यावर सापडलेली महत्त्वाच्या कागदपत्रांनी भरलेली बॅग त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता मूळ मालकाच्या हवाली केली असून, त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रकाश पाटील हे बोहरा गावाचे माजी उपसरपंच असून समाजसेवेची ओळख लाभलेली आहे. ते नुकतेच सोनगीरवरून परत येत असताना अजंदे-वाळखेडा गावादरम्यान रस्त्याच्या कडेला त्यांना एक बॅग दिसली. सहज जाऊन पाहिले असता, ती बॅग कोणत्याही सामान्य वस्तूंनी नव्हे, तर महत्त्वाच्या मूळ कागदपत्रांनी भरलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, न्यायालयीन दस्तऐवज आणि इतर वैयक्तिक महत्त्वाचे कागदपत्रे होती.

त्यानंतर त्यांनी ती बॅग ताबडतोब घेऊन मारवड गाठली आणि पत्रकार डॉ. विलास पाटील यांच्या मदतीने मारवड पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बॅगेतील कागदपत्रांवरून मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानुसार ही बॅग सोनगिर येथील दिनेश सुरेश देवरे यांची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून माहिती मिळताच दिनेश देवरे यांनी पोलीस ठाणे गाठून आपल्या हरवलेल्या बॅगेची ओळख पटवून ती ताब्यात घेतली.

आपली महत्त्वाची कागदपत्रे सुखरूप परत मिळाल्याने दिनेश देवरे यांनी प्रकाश पाटील यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या बॅगेत असलेली कागदपत्रे अत्यंत मौल्यवान असून त्यांची हानी झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असत्या. प्रकाश पाटील यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे मोठे नुकसान टळले.

या प्रामाणिकपणाच्या कृतीची दखल घेत मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जीभाऊ पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पत्रकार डॉ. विलास पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी, मूळ मालक दिनेश देवरे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. समाजात प्रामाणिकपणाची उणीव असलेल्या काळात अशी उदाहरणं प्रेरणादायक ठरतात.

ही घटना हे सिद्ध करते की, अजूनही समाजात प्रामाणिक व्यक्तींची कमतरता नाही. प्रकाश पाटील यांच्या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.


Protected Content

Play sound